नवी मुंबईत विमानतळाजवळ उभारण्यात येणाऱ्या एज्यू सिटीची प्रस्‍तावित जागा  Pudhari News Network
मुंबई

International Education City |नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सिडको उभारणार आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी!

५ विदेशी विद्यापीठांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते दिले जाणार इरादापत्र

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्यात दहापैकी पाच जागतिक स्तरावरील परदेशी विद्यापीठांना इरादापत्रे देण्यात येणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवार, दिनांक १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान केली जाणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात सिडकोचे नामांकित १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे.

यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ , इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या परदेशी विद्यापीठांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण दैशातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात नामांकित १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT