मुंबई : हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील चित्रपट आले की चित्रपट मराठी चित्रपट चालणार नाही, असे आरोप-प्रत्यारोप न होण्यासाठी फक्त काही चित्रपटगृहे खास मराठी चित्रपटांसाठीच असावीत आणि या चित्रपटगृहांत बटाटेवडा किंवा थोडा स्वस्तातील खाऊ मिळावा अशी सोय असावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या ‘चित्रपताका’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
नाट्यमंदिराच्या मुख्य सभागृत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ दिग्दर्शक किरण शांताराम, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते.
मराठी नाटकं दणकून चालतायत, पण मराठी सिनेमेला प्रेक्षक का वळत नाहीये? मराठी सिनेमा बघायला का येत नाहीये? यावर चित्रपताका महोत्सवात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून सोनाली कुलकर्णी म्हणाल्या (चित्रपताकासारख्या चित्रपट महोत्सवामुळे कलाकारांचा हुरूप वाढतो, असे त्या म्हणाल्या. नाटकाला जाण्याचा जो उत्सव आपण साजरा करतो, तो सिनेमाला जाण्याचा उत्साह का आपला कमी होतो, असा सवाल करून त्या म्हणाल्या, अन्य भाषांतील चित्रपट आणि ओटीटी यांचं संकट येऊन उभं राहिलंय की काय? याचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
फक्त मराठी चित्रपटांसाठी राखीव असलेल्या चित्रपटगृहांत किमान तीन खेळ मराठी चित्रपटांचे होतील. दर आठवड्याला सहा, सात, मराठी चित्रपट येणार असतील, तर ते इतर भाषांच्या सिनेमांसमोर कसे टिकाव धरू शकतील? याचा विचार व्हावा, असे त्या म्हणाल्या. महोत्सवांनी, समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी माझं वेगवेगळ्या भाषांमधलं काम उचलून धरले म्हणून मला असे महोत्सव महत्त्वाचे वाटतात, असे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपट नेण्याचे चित्रपताका हे एक माध्यम असल्याचे मनोगत सांस्कृतिक कार्य संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. या महोत्सवाला चीन, मेक्सिको, बांगलादेश बेल्जियम आणि अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तंत्रज्ञानावरील चित्रपटांचा खर्च शासन करणार
सरकारी योजनेतून राष्ट्रीय, राज्य किंवा महानुभाव किंवा विभूतीवर सांस्कृतिक कार्य विभाग चित्रपटनिर्मिती करते. त्याचप्रमाणे भावी पिढीसाठी तंत्रज्ञानावर आधारित उपयुक्त मराठी चित्रपटाची निर्मितीचा खर्च राज्यशासन करेल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. बेस्टच्या जागांच्या होणाऱ्या वाणिज्य वापरात येत्या ३ वर्षात मराठी चित्रपटगृहासाठी प्राधान्याने जागा विकसित करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.