Chitra Wagh On Vote Chori:
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 'बुरख्याआडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही' असे म्हणत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी निवडणूक याद्यांमधील कथित त्रुटींबाबत मुस्लिम नावे घेऊन ती काढण्याची मागणी करण्याचे आव्हान विरोधकांना दिले आहे. त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना उबाठावर टीका केली.
चित्रा वाघ यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्याआडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पुराव्यांसह सर्व सत्य जनतेसमोर आणले आहे. यावरून 'मतचोरी' म्हणत गळा काढणारे विरोधकच 'वोट जिहाद'चे सूत्रधार तर नाहीयेत ना, असा संशय आम्हाला येत आहे.
निवडणूक याद्या स्वच्छ झाल्याच पाहिजेत, यावर भर देत चित्रा वाघ यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. त्या म्हणाल्या, "केवळ हिंदू आणि दलित बांधवांना टार्गेट करू नका. तुमच्या पुढच्या सादरीकरणामध्ये मुस्लिम नावे घेऊन ती काढण्याची मागणी करण्याची हिंमत दाखवाल का?" चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नुकतेच विरोधकांनी वोट चोरीवरून आपली आरोपांची धार तीव्र केली आहे. राज ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी देखील मतदार याद्यांमधील तृटी दाखवण्यासाठी एक प्रेझेंटेशन केलं होतं. त्यांनी राहुल गांधींच्या स्टाईलने ही मांडणी केल्यामुळं त्यांच्यावर सत्ताधारी भाजपनं महाराष्ट्रातील राहुल गांधी अशी खोचक टीका देखील केली होती.