मुंबई : वाढती स्पर्धा, अभ्यासाचे ओझे, मैदानी खेळाचा अभाव आणि मोबाईलचा अतिवापर या कारणांमुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. बालपणीच्या मजा मस्तीच्या दिवसांत राज्यातील शालेय विद्यार्थी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. राज्य आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य अहवालानुसार केवळ एका वर्षात शालेय विद्यार्थ्यांमधील ताणतणावाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 2024-25 मध्ये 2779 सत्रे घेण्यात आली. यात 13 हजार 699 शालेय विद्यार्थी तणावग्रस्त आढळले, त्यापैकी 9451 विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार द्यावे लागले. 2023-24 मध्ये 5266 आणि 2022-23 मध्ये 1720 विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाची लक्षणे आढळली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या समस्यांचा मोठा फटका बसला असून 2024-25 मध्ये 811 तपासणी सत्रांतून 3300 तरुण तणावग्रस्त व नैराश्यग्रस्त आढळले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, प्रौढांप्रमाणेच मुलांमध्येही ताण वाढतो आहे. स्पर्धा, प्रथम येण्याचा दबाव, खेळाची कमतरता, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे तणाव वाढतो मुलांना पूर्वी मिळणारे स्वातंत्र्य आता उरलेले नाही, असे त्या म्हणाल्या.
बालरोग मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीना सावंत यांनी सांगितले की, बालपणातील घटनांचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि त्याची भीती अनेकदा आयुष्यभर त्यांच्या मनात राहते. त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत पालक, शिक्षक आणि समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, टेलिमन हेल्पलाइनवर दररोज सरासरी 267 कॉल्स येतात, त्यापैकी चार कॉल्स हे 12 वर्षांखालील मुलांकडून येतात. अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की, मुलांना भावनिक संकट, शैक्षणिक दबाव, कौटुंबिक वाद आणि ओळखीच्या समस्यांबाबत मदतीची गरज भासत आहे. समुपदेशकांकडे परीक्षेतील ताण, करिअरची अनिश्चितता आणि अपयशाबद्दल चिंता व्यक्त करणारे कॉल्स सर्वाधिक येतात.