मुंबई : चिकनगुनियामध्ये (Chikungunya) ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी प्राथमिक लक्षणे आढळून येतात. काही खासगी रुग्णालयांनी न्यूरोलॉजिकल लक्षणे, अर्धांगवायू, नाकावर, तोंडावर काळे चट्टे म्हणजेच हायपर प्रिंग्मेंटेशन अशी लक्षणे आढळून आल्याचे सांगत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र यापूर्वीच राज्य आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ही लक्षणे नमूद असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
आजाराच्या वस्तुस्थितीची शहानिशा करण्यासाठी जलद कृती दल (आरआयटी) स्थापन करण्यात आली. यामध्ये ही लक्षणे नव्याने दिसून येत नाहीत, तर प्रत्यक्षात भूतकाळातील बऱ्याच रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आलेली आहेत. चिकनगुनिया या आजाराबरोबर इतर आजार असल्यास (म्हणजेच डेंग्यू, झिका, जपानी मेंदुज्वर इ. आजारांमध्येही अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. चिकनगुनिया व डेंगी आजाराच्या लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साम्य असू शकते. तसेच चिकनगुनियामध्ये डेंगीप्रमाणे प्लेटलेट कमी होणे, नाकाभोवती काळसर डाग पडणे व अधिक गुंतागुंत होऊन मज्जासंस्थेस लागण होणे हे नेहमी न आढळणारे पण चिकनगुनियामुळे होऊ शकणारी लक्षणे दिसून येऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या आजाराच्या केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही ही लक्षणे नमूद केलेली आहेत.
याबाबत एक बैठक आयोजित करून त्यामध्ये पुण्यातील तसेच राज्यातील कोणत्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्याची माहिती घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिकेने पुण्यातील तीन रुग्णालये, केईएम रुग्णालय, नोबल रुग्णालय व ससून रुग्णालय यांना पत्र पाठवून अशा प्रकारच्या रुग्णांची माहिती पाठविण्यास सांगितले आहे.