मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  File Photo
मुंबई

भाजपच्या यादीवरून मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी

Maharashtra Assembly Election|भाजपच्या यादीत शिवसेनेने दावा केलेल्या पाच जागांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत शिवसेनेने दावा केलेल्या पाच जागांचा समावेश असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेला विचारात न घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीवर त्यांनी भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्या यादीत भाजपने कल्याण पूर्वमधून गोळीबार प्रकरणात तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर मते मांडली.

ज्या आमदाराने स्वतः गोळीबार केला, त्याच्या कुटुंबीयांना दिलेली उमेदवारी योग्य नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्याने कल्याणमधील पदाधिकार्‍यांनी शिवसेना सोडण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय नालासोपारा, उरण, धुळे शहर, अचलपूर, देवळी या मतदारसंघावरही शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला होता. भाजपने या जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT