Maharashtra Assembly polls :कर्जत-जामखेडमध्ये तरुण तुर्क आणि अनुभवी ज्येष्ठांमधील लढत

2019 प्रमाणे यावेळीही लढत निश्चित
karjat jamkhed
कर्जत-जामखेडPudhari
Published on
Updated on

गणेश जेवरे

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अखेर अपेक्षेप्रमाणे आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोन मातब्बर उमेदवारांमध्येच 2019 प्रमाणे यावेळीही लढत निश्चित झाली आहे. हा मतदारसंघ राज्यातील सर्वांत लक्षवेधी आहे. मागील वेळी शरद पवार यांचा नातू रोहित पवार या भाजपच्या बालेकिल्ल्यात नशीब आजमावत होता. या नवख्या युवा शिलेदाराच्या विरोधात राज्यातील बारा खात्याचे मंत्रिपद सांभाळणारे व सलग दोन वेळा आमदार झालेले राम शिंदे हे उभे होते. मात्र या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी सलग 25 वर्षे अबाधित असणारा भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत पहिल्याच निवडणुकीमध्ये 43 हजार 347 मतांनी विजय मिळवत राज्यातील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली होती.

चित्र बदलले, पक्ष बदलले

आता सन 2024 मध्ये देखील पुन्हा एकदा याच दोघांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. मात्र 2019 पेक्षा यावेळी च्या विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र बर्‍याच प्रमाणामध्ये बदलल्याचे पाहावयास मिळते. सन 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी. मात्र आता महायुती व महाविकास आघाडी यांचे राजकारण गल्लीपासून मुंबईपर्यंत सुरू आहे. शिवसेनेचे दोन पक्ष झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील दोन भागात विभागली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आज अनेक नेते या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यात नामदेव राऊत, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंखे, मधुकर राळेभात, प्रवीण घुले, राजेंद्र गुंड, अशोक जायभाय, नाना निकत, संतोष मेहत्रे, पंढरीनाथ गोरे, मंगेश आजबे, यासह अनेक लहान-मोठ्या नावांची यादी आहे. अशा पद्धतीने या नेत्यांबरोबर मतदारसंघातील राजकारण, मतांची गोळाबेरीज आणि एकूणच बरेच चित्र बदललेले पाहावयास मिळत आहे.

नवीन चेहरे आणि युवकांना संधी

आमदार रोहित पवार यांच्याकडे मोठ्या संख्येने युवा नेतृत्व आणि नवीन चेहरे पाहावयास मिळतात. त्यांच्याकडे मोठ्या नेत्यांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र युवकांचा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे कल दिसून येतो. यामुळे या निवडणुकीत अनुभवी व वृद्ध नेते विरुद्ध सळसळती तरुणाई आणि युवा नेतृत्व यांच्यातील राजकीय संघर्ष यावेळी होत आहे.

त्याच प्रश्नांवर पुन्हा निवडणूक

विधानसभेची निवडणूक म्हणजे विकासाचे प्रश्न, सोडवलेले प्रश्न, प्रलंबित प्रश्न यावर निवडणूक होते. या निवडणुकीत रद्द झालेली एमआयडीसी व नवीन होत असलेली एमआयडीसी, कर्जत एसटी डेपो जामखेड शहराची पाणी योजना, तुकाई पाणी योजना, झालेला विकास, अपूर्ण विकास, यासह अनेक प्रश्नांवर प्रचाराची राळ उडवली जाणार आहे. यासाठी दोन्ही नेत्यांनी जाहीर सभांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यासाठी तयारी केल्याचे दिसून येते.

विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये स्वाभिमानी यात्रा, भूमिपुत्रांच्या यात्रा, गाव भेट यात्रा, विजय संकल्प यात्रा, युवा संकल्प यात्रा, अशा विविध यात्रा काढून दोन्ही गटांच्या व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावापर्यंत जाऊन आपली पक्ष आणि नेतृत्व यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून आपणच बाजी मारणार, असे चित्र निर्माण करण्यात येत आहेत.

जातीय समीकरण महत्त्वाचे

लोकसभा निवडणुकीनंतर जातीय व धर्मीय समीकरणाला महत्त्व निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते. यामुळे या निवडणुकीतदेखील जातीय समीकरण कशा पद्धतीने निर्माण होतात, त्यावर निकालाचे पारडे फिरणार आहे.

राम शिंदे यांना पुन्हा ताकद

मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आमदार राम शिंदे यांना पक्षाने विधान परिषदेत संधी दिली. तेथे आमदार झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुती सत्तेवर आली. यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात पुन्हा ताकद मिळाली. त्यांनी या संधीचा नेमका फायदा घेत रोहित पवार यांच्यापासून नाराज असलेल्या अनेक नेतेमंडळींना आपल्यासोबत घेतले. मात्र या नेत्यांच्या पाठीमागे किती प्रमाणामध्ये जनता आहे, हे या निकालानंतरच दिसून येईल.

बंडखोरी किती प्रमाणात

सध्या अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भूमिपुत्र स्वाभिमान यासह विविध माध्यमातून अनेक जणांनी चाचणी केली आहे. काही जणांची अजूनही सुरू आहे म्हणून जरांगे पाटील यांचीदेखील आंतरवाली येथे जाऊन भेट घेऊन मुलाखती देऊन अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणामध्ये किती जण उतरणार हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news