Chembur School Bus Tree Collapse pudhari
मुंबई

Chembur School Bus Tree Collapse: चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, सल्लागाराला दंड

चौकशी समितीचा अहवालात गंभीर समस्यांवर प्रकाश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: चेंबूर येथील डायमंड गार्डनजवळ ३० जून रोजी स्कूल बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अहवाल आता समोर आला आहे.

दुर्घटनेत कंत्राटदार, सल्लागाराचा निष्काळजीपणा उघड झाला. महापालिकेकडून ७ लाखांचा दंड आकारला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अहवालात वृक्ष संरक्षण आणि रस्ते प्रकल्पांदरम्यान समन्वयाचा अभाव या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला असून, कंत्राटदार आणि तांत्रिक सल्लागारावर आर्थिक दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तपास समितीने रस्ते बांधकामासाठी जबाबदार असलेल्या 'गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड' या कंत्राटदारावर ५ लाख रुपये आणि कामाचे तांत्रिक पर्यवेक्षक असलेल्या मे. माहिमतुरा कंन्सलटंट यांनाही २ लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस केली आहे.

रस्ते विभागाने कंत्राटदाराला झाडाजवळ खोदकाम करताना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते, परंतु पुरेशी खबरदारी घेण्यात आली नाही.

समितीने अशीही शिफारस केली आहे की, भविष्यातील कोणत्याही रस्ता किंवा पायाभूत सुविधा प्रकल्पाचा एक अनिवार्य भाग म्हणून वृक्ष संरक्षणाचा समावेश केला जावा.

तसेच, खोदकामादरम्यान झाडांच्या मुळांजवळ जेसीबी किंवा पोकलेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या वापरास बंदी घालणे, 'वृक्षमित्र' मोहिमेत स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेणे आणि संशयास्पद स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्यासाठी एक डिजिटल प्रणाली विकसित करणे, अशा सूचनाही समितीने केल्या आहेत.

या शिफारसींची अंमलबजावणी केल्यास शहरातील वृक्ष संरक्षण सुधारेल आणि पावसाळ्यात अशा अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.

उद्यान, रस्ते विभागाला क्लीनचिट?

अहवालात हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, या अपघातासाठी केवळ कंत्राटदारालाच जबाबदार धरता येणार नाही, कारण अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा आणि इतर नैसर्गिक कारणे देखील झाड कोसळण्याची संभाव्य कारणे होती.

तपासानुसार, २८ जून ते ५ जुलै दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अंदाजे १,१५८ झाडे आणि त्यांच्या मोठ्या फांद्या कोसळल्या. अपघाताच्या दिवशी चेंबूर परिसरातही सोसाट्याचा वारा आणि सततच्या पावसाचा परिणाम जाणवला.

समितीने उद्यान विभाग आणि रस्ते विभागाच्या भूमिकेचा आढावा घेताना म्हटले आहे की, दोन्ही विभागांनी आवश्यक कार्यपद्धतीचे पालन केले आणि प्रथमदर्शनी कोणतीही स्पष्ट निष्काळजीपणा आढळला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT