मुंबई

Maharashtra Politics: मोदींनी फडणवीसांना दिली केंद्रात येण्याची ऑफर? राऊतांच्या दाव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

राऊतांना तिसरा डोळा कोणी दिला माहीत नाही, तसे काही होणार नसल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: देशाचे उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकत असेल तर ते नाव हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते माहित आहे. माझ्या माहितीनुसार तुम्ही केंद्रात या, मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून खात्याची जबाबदारी घ्या.

तुम्ही केंद्रात या, महाराष्ट्रात तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल, असे मोदी यांनी फडणवीस यांना सांगितल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, भाजपने राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवत त्यांना वावड्या ठरविले आहे. राऊतांना तिसरा डोळा कोणी दिला माहीत नाही, तसे काही होणार नसल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत विधान केले आहे. देशाच्या शिक्षण खात्यासाठी एक उच्चशिक्षित, दूरदृष्टी असलेला आणि चांगला प्रशासक हवा आहे, असे पंतप्रधान मोदींच्या मनात आहे. या क्षणी देशामध्ये असा उत्तम शिक्षणमंत्री होऊ शकणारी व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत.

पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली असून, 'तुम्ही केंद्रात यावे' अशी सूचना मोदींनी केली आहे, अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांनी केंद्रात यावे अशी सूचना करतानाच, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नेमला जाईल, अशी माझी माहिती आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.

त्यांच्या या विधानावर भाजपकडूनही प्रतिक्रीया आल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस केंद्रात जाण्याच्या वावड्यांवर लक्ष देऊ नका, असे उत्तर दिले. विकसीत महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात.

राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही. पण फडणवीस साहेब राज्यातच राहाणार. त्यामुळे राऊतांच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका असेही बावनकुळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT