मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अनुयायी अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले असून चैत्यभूमी परिसर लोकांनी गजबजायला सुरूवात झाली आहे. पुस्तकांच्या दुकानांवरही गर्दी दिसायला लागली आहे. यंदा चैत्यभूमीवर 100 हून अधिक बुक स्टॉल असतील आणि पुस्तक विक्रीचा विक्रम नोंदवला जाईल, असा अंदाज पुस्तक विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
बौद्ध बांधवांसह चैत्यभूमीला बाबासाहेब आंबेडकरांच्या विपुल लेखनसंपदेचे कायम आकर्षण असल्याचे पुस्तक विक्रेते साहेबराव केदारे तसेच बालाजी व संजीवनी सरवदे यांनी सांगितले.बाबासाहेब आणि पुस्तकांचे अमूल्य नाते आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा महामंत्र त्यांनी संपूर्ण जगाला दिला. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर लाखो अनुयायांचे पाय बुकस्टॉल्सकडे वळतात. त्यात शिक्षित, अशिक्षित अशा सर्वांचा समावेश असतो. अनेक आई-वडिल आपल्या मुलांसाठी पुस्तके विकत घेतात, असे साहेबराव केदारे यांनी सांगितले.
कोणती पुस्तके उपलब्ध?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, शुद्र पूर्वी कोण होते? हिंदू कोड बिल, प्रॉब्लेम ऑफ रूपी, हिंदू कोड बिल, माझी आत्मकथा, अस्पृश्य मूळचे कोण? हिंदू धर्मातील कूट प्रश्न अशा अनेक पुस्तकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिक जीवन आठवणी (ॲड. हरिभाऊ पगारे), गुलामगिरी (लेखक-ज्योतिराव फुले), मुक्ती कोन पथे (कॉ. शरद पाटील), मध्यमयुगीन भारताचा इतिहास, महाराष्ट्र एक भाषावार प्रांत, ऊठ मराठ्या ऊठ, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे आदी पुस्तके या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
वसई येथील अंगणवाडी शिक्षिका शुभांगी संदीप जाधव या त्यांच्या सहकाऱ्यांसह पुस्तके खरेदी करताना दिसल्या. त्यांनी द बुद्ध अँड हिज धम्म (बुद्ध आणि त्यांचा धम्म) पुस्तक विकत घेतले. शिक्षण आणि वाचनावर आंबेडकर यांचे विलक्षण प्रेम होते. त्यामुळे चैत्यभूमीवर आलेला प्रत्येक जण एखादे पुस्तक घेऊन घरी जातो आणि बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असे त्या म्हणाल्या.