मुंबई

फुकट्या प्रवाशांनो सावधान; मध्य रेल्वे करणार कडक कारवाई

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विना तिकिट प्रवाशांची वाढती संख्या कमी करण्यासाठी बुधवारी (दि.१९) मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांकडे मेल-एक्सप्रेसचे तिकिट नसेल, त्या प्रवाशांकडून प्रवास केलेल्या स्थानकापर्यत दंड वसूल होणार असून त्या प्रवाशांना पुढील स्थानकात उतरविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी, दादर, एलटीटी आणि पनवेल ही प्रमुख चार टर्मिनल आहेत. या चार टर्मिनलहून दररोज सुमारे १०० मेल-एक्सप्रेस गाड्या देशाच्या विविध भागाकरिता चालविण्यात येतात. बऱ्याचदा मेल-एक्सप्रेसचे प्रवासी विनातिकिट आरक्षित डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आधी तिकिट काढून आरक्षित केलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. याशिवाय अनेकदा आरक्षित प्रवासी आणि तिकिट नसलेल्या प्रवाशांमध्ये वाद होतात. विना तिकिट प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल देखील बुडतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने मेल-एक्सप्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कडक कारवाई करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

पूर्वी तिकिट नसलेला प्रवासी टीसीकडे दंड भरुन प्रवास करु शकायचा. परंतु आता ज्या प्रवाशाकडे वैध तिकिट नसेल त्या प्रवाशाला पुढच्या स्थानकात उतरविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशाकडून सरसकट दंड न घेता त्याने प्रवास केलेल्या स्थानकादरम्यानचाच दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. कारण प्रवाशाला जर मधल्या कुठल्या स्थानकात उतरविले तर त्याला प्रवासाकरिता वेगळया गाडीची सोय करावी लागणार आहे. त्यातच जर रात्रीच्या वेळी प्रवाशाला मधल्या स्थानकात उतरविले तर त्याची मोठी गैरसोय होणार आहे.त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेल-एक्सप्रेसचे वैध तिकिट घेउनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT