Central Railway Accident Mumbai pudhari photo
मुंबई

Central Railway Accident Mumbai : मध्य रेल्वेच्या गोंधळात ३ मृत्यू ; नातेवाइकांच्या मदतीत कायदेशीर पेच

रेल्वे प्रवासादरम्यान पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडणे किंवा रुळांच्या परिसरात वावरणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावर सोमवारी झालेल्या अभूतपूर्व गोंधळादरम्यान तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाइकांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत किंवा नोकरी मिळावी, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या तिन्ही प्रवाशांचे मृत्यू हे रेल्वे रुळांवर (रूळ ओलांडताना किंवा पडल्यामुळे) झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, त्यांना रेल्वेकडून कोणतीही मदत मिळण्याबाबत मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेडवर वायरीचा तुकडा पडल्यामुळे आणि कांजूरमार्ग रिले रूममधील आगीमुळे सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. यामुळे सोमवारी लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांचा अभूतपूर्व खोळंबा झाला. या रेल्वे गोंधळात भांडुप स्थानकाजवळ २१ वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान राहुल राजभर (वय २५) आणि खरबान राजभर (वय ४०) या दोघांचे मृतदेह रेल्वे रुळांवर आढळून आले.

मात्र, मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना किंवा गाडीतून पडल्यामुळे मृत पावल्याचे समोर आले आहे. परिणामी, मृतांच्या वारसांना रेल्वेकडून आर्थिक मदत किंवा नोकरी देण्याबाबत मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडणे किंवा रुळांच्या परिसरात वावरणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो. अशा प्रकरणांमध्ये रेल्वे कायद्यानुसार मृत प्रवाशांच्या नातेवाइकांना सहानुभूतीपूर्वक मदत देण्याची कोणतीही तरतूद रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

शिवाय, सोमवारी झालेल्या या तिन्ही मृत्यूंचे प्राथमिक कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट व्हायचे आहे. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी स्पष्ट केले आहे.

८६ लोकल रद्द, ७ एक्सप्रेस रीशेड्युल

मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे तब्बल ८६ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच, मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या ७ मेल-एक्सप्रेस गाड्या नियमित वेळापत्रकाऐवजी रिशेड्युल (वेळेत बदल) करून सोडण्यात आल्या. रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे उपनगरीय लोकल प्रवाशांसह मुंबईबाहेर प्रवासासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT