मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून पायाभूत सुविधा आणि देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी २८ जून २०२६ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानका दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
यासाठी नेहमीच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून लोकल १५ मिनिटे उशिराने धावणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी १५.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी,मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी १५.३२ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा या गाड्या १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.
ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी १५.५१ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड स्थानकावर जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी १६.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.
ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येतील.