मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर लोकलसेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत लोकल फेर्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सरासरी 60 हून अधिक लोकल फेर्या रद्द केल्या जात असल्याने नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत मध्य रेल्वेने विविध कारणांमुळे 1 ते 10 सप्टेंबरदरम्यान, 768 लोकल फेर्या रद्द करुन प्रवाशांचे हाल केले. गेल्या आठवड्यात गणेशोत्सवाची धामधूम होती. त्या काळात प्रवाशांची विशेष व्यवस्था करण्याऐवजी मध्य रेल्वेने गणेशभक्तांचेही हाल केल्याचे यातून उघड झाले. यावर प्रवासी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
मध्य रेल्वे लोकांना वेठीस धरत आहे. प्रशासनाने वेळीच कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी दिला आहे. प्रवाशांना बुलेट ट्रेन नको, मूलभूत सुविधा सुधारा, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघाचे राजेश पंड्या यांनी दिली.
रविवारी तब्बल 200 फेर्या केल्या रद्द
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दक्षिण मुंबईच्या दिशेने येणार्या प्रवाशांचे प्रमाण अधिक होते. त्यांच्या सोईसाठी अधिक व्यवस्था करण्याऐवजी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या गैरसोईत भर टाकली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 72 आणि रविवारी तब्बल 200 लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या. याचा प्रचंड त्रास वीकेण्डला घराबाहेर पडलेले प्रवासी आणि गणेशभक्तांना झाला.
परेवर रविवारी दिवसा ब्लॉक नाही
रेल्वे मार्ग, सिग्नलिंग प्रणाली आणि अन्य कामांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेने शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांमधील अप आणि डाऊन स्लो लाईनवर 00.30 वाजता ते 04.30 वाजेपर्यंत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाईल.त्यामुळे या मार्गावर दिवसकाळातील ब्लॉक राहणार नाही.
ब्लॉक कालावधीदरम्यान अप स्लो लाइनच्या गाड्यांना बोरिवली आणि अंधेरी स्थानकांमधील अप फास्ट लाइनवर चालवण्यासाठी डायव्हर्ट केले जाईल. परिणामी, या गाड्या प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे, काही अप आणि डाऊन गाड्या रद्द राहतील आणि काही गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले जाईल.
हार्बरवर चौदा तर मध्य मार्गावर 4 तासांचा ब्लॉक
मुंबई लोकलने प्रवास करणार्या प्रवाशांना या आठवड्यात केवळ रविवारीच नाही तर शनिवारीही अडचणींचा मोठा सामना करावा लागणार आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला-टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे साडेचौदा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा बंद राहील. मध्य रेल्वेवर ठाणे व कल्याण दरम्यान रविवारी दुपारपर्पंयत चार तासांचा ब्लॉक घेतला आहे.
शनिवारी रात्री 11.05 ते रविवारी दुपारी 1.35 पर्यंत हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक आहे. यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ब्लॉकपूर्वी शेवटची पनवेल-सीएसएमटी लोकल रात्री 9.52 वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावरील वाशी/बेलापूर/पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून शनिवारी रात्री 10.14 वाजता सुटेल.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल रविवारी दुपारी 1.09 वाजता पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने रवाना होईल. डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीहून रविवारी दुपारी 1.30 वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल- मानखुर्द- पनवेलदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने रविवार ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यानच्या 5 व्या व 6 व्या मुख्य मार्गिकेवर रविवारी सकाळी 09.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. यामुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. त्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.