मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे कोलमडली. या बिघाडामुळे कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या 2 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
गेल्या वर्षभरापासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवासी त्रस्त आहेत. गुरुवारच्या बिघाडामुळे स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे येणारी प्रत्येक लोकल तुडुंब भरलेली होती. त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले. दुपारच्या सुमारास हा तांत्रिक बिघाड दूर करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. मात्र दिवसभर वेळापत्रक विस्कळीतच होते.
कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंब्रा या भागातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस गाड्या वेळेवर धावत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांचे नियोजन रेल्वेच्या दिरंगाईमुळे पूर्णपणे कोलमडत आहे. त्यामुळे रेल्वेच्या या गोंधळामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे प्रशासन गाड्या वेळेवर चालवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. आम्ही रोज वेळेवर घराबाहेर पडतो, पण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकू की नाही, याची खात्री उरलेली नाही, अशी भावना एका संतापलेल्या प्रवाशाने व्यक्त केली. विशेष म्हणजे नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आणि तो कुठे झाला हे देखील सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले नाही