onion News Pudhari
मुंबई

Central Government Decision : केंद्र सरकार आता 24 रुपये किलोने कांदे विकणार

दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे विक्री

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • वाढत्या महागाईवर विरोधकांचा हल्ला

  • बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महागाईचा मुद्दा एनडीएसाठी डोकेदुखी बनू नये

  • मोदी सरकारचा निर्णय : २४ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकण्याची योजना

मुंबई/नवी दिल्ली : वाढत्या महागाईवर विरोधकांच्या हल्ल्यांमुळे चिंतेत पडलेल्या केंद्र सरकारने मदत उपाययोजनांना वेग दिला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महागाईचा मुद्दा एनडीएसाठी डोकेदुखी बनू नये म्हणून, मोदी सरकारने गुरुवारपासून (दि.4) २४ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकण्याची योजना सुरू केली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात केली. याअंतर्गत, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये एनसीसीएफ, नाफेड आणि केंद्रीय भांडारच्या व्हॅनमधून कांद्याची किरकोळ विक्री केली जात आहे.

सरकारचा दावा आहे की, या पावलामुळे ग्राहकांना थेट दिलासा मिळेल आणि बाजारपेठेतील किमतींवर नियंत्रण येईल. प्रल्हाद जोशी म्हणाले की, अन्नधान्य महागाई नियंत्रित करणे ही केंद्राची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि अलीकडच्या काही महिन्यांत किंमत स्थिरीकरणाच्या प्रयत्नांचा परिणाम दिसून आला आहे. त्याच वेळी, विरोधकांनी या उपक्रमाचे वर्णन जनतेच्या दबावाखाली उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, जोपर्यंत घाऊक बाजारात कांद्याचे दर नियंत्रित होत नाहीत तोपर्यंत मोबाईल व्हॅनमधून होणारी विक्री ही केवळ एक ढोंग आहे.

वितरण भागीदारांद्वारेदेखील स्वस्त दरात कांदे

विरोधकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा कांद्याचे उत्पादन २७ टक्क्यांनी वाढून ३०७.७१ लाख टन झाले आहे आणि निर्यातीवर बंदी नाही, तेव्हा देशांतर्गत बाजारात किमती का वाढल्या? त्याच वेळी, सरकारचा दावा आहे की, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये सुरू झालेली ही विक्री येत्या काळात अधिक राज्यांमध्ये वाढवली जाईल. सरकारने असे संकेत दिले आहेत एनसीसीएफ आणि नाफेड आऊटलेटस्व्यतिरिक्त, त्यांच्या वितरण भागीदारांद्वारेदेखील स्वस्त दरात कांदे उपलब्ध करून दिले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT