RBI Pudhari
मुंबई

Bank Account Fraud: ‘आरबीआय’मधील सेंट्रल बँकेच्या खात्यातून १३.९६ कोटींची अफरातफर

महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सेटलमेंट खात्यातून १३ कोटी ९६ लाख रुपयांची कथित अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

१५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान १८७ अनधिकृत व्यवहारांच्या माध्यमातून ही रक्कम ३६ बँकांमधील विविध खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कोषागार विभागाचे महाव्यवस्थापक भास्कर गोरुगंटू यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. बँकेच्या अंतर्गत तपासणीदरम्यान हे संशयास्पद व्यवहार आढळले.

मात्र, बँकेच्या नियमित व्यवहार नोंदी, मुख्य बँकिंग प्रणाली, इंटरनेट व मोबाइल बँकिंग तसेच संबंधित आर्थिक संदेशवहन प्रणालीमध्ये या व्यवहारांची नोंद आढळली नाही. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणत्या पद्धतीने वळविण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

तीन दिवसांत १८७ व्यवहार

पोलिस तक्रारीनुसार १५ ऑक्टोबर रोजी सहा, १६ ऑक्टोबर रोजी ८८ आणि १७ ऑक्टोबर रोजी ९३ असे एकूण १८७ व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांतून पैसे ३६ बँकांमधील खात्यांमध्ये पाठविण्यात आल्याचे नमूद आहे.

बँकेच्या तक्रारीनुसार, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस या आरबीआयच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या केंद्रीय एसएफएमएस सर्व्हरपर्यंत अनधिकृत प्रवेश मिळवून व्यवहार केल्याचा संशय आहे. बँकेच्या प्रणालीमार्फत या सर्व्हरपर्यंत प्रवेश करून पैसे वळविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बँकेच्या तक्रारीनुसार, एसएफएमएस डेटाबेसच्या नोंदींमध्ये दहा व्यवहारांचे अंशतः ठसे आढळले. मात्र त्यांच्याशी संबंधित व्यवहार क्रमांक बँकेच्या नोंदींशी जुळत नव्हते. तसेच या व्यवहारांमध्ये पैसे पाठविणारे म्हणून नमूद केलेली खाती सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT