मुंबई : बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणी पद्धतीत मोठा बदल करत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2026-27 शैक्षणिक वर्षापासून ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (ओएसएम) प्रणाली लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यापूर्वी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांसाठी पेपर तपासणीच्या मूल्यांकन प्रणालीत बदल करण्याची योजना आखली आहे. सीबीएसईकडून दरवर्षी 26 देशांमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये एकूण सुमारे 46 लाख विद्यार्थी सहभागी होतात. त्यापैकी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन 2026 पासून पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे; मात्र दहावीच्या उत्तरपत्रिका सध्या जुन्या स्वरूपातच तपासल्या जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
नव्या पद्धतीनुसार बारावीच्या उत्तरपत्रिका प्रथम स्कॅन करून डिजिटल स्वरूपात रूपांतरित केल्या जातील. त्यानंतर शिक्षक संगणकावरच या उत्तरपत्रिका तपासतील. त्यामुळे प्रत्यक्ष उत्तरपत्रिका हाताळण्याची गरज राहणार नाही. या नव्या पद्धतीची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी शाळांकडे आवश्यक तांत्रिक सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक स्टॅटिक आयपी असलेली संगणक प्रयोगशाळा, विंडोज 8 किंवा त्यापुढील प्रणाली असलेले संगणक, किमान 4 जीबी रॅम, अद्ययावत ब्राउझर, ॲडोब रीडर, किमान 2 एमबीपीएस वेगाचे स्थिर इंटरनेट आणि अखंडित वीजपुरवठा या सुविधा शाळांनी आधीच तयार ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या प्रणालीशी शिक्षकांना जुळवून घेता यावे यासाठी ‘ओएएसआयएस’ आयडी असलेल्या सर्व शिक्षकांना लॉग-इन करून प्लॅटफॉर्मची ओळख करून देण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक ‘ड्राय रन’ घेण्यात येतील, तसेच प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील. अडचणी सोडवण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून मार्गदर्शक व्हिडिओही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
ओएसएम प्रणालीचे प्रमुख फायदे
गुण बेरीजमधील चुका टाळल्या जातील
मूल्यमापनाचा वेग वाढणार
वाहतूक वेळ व खर्चाची बचत
शिक्षकांना शाळेतूनच तपासणीची सुविधा
पडताळणीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी
सर्व संलग्न शाळांचा सहभाग
परदेशातील शाळांतील शिक्षकांचा सहभाग
पर्यावरणपूरक मूल्यमापन प्रक्रिया
मूल्यमापन प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि पारदर्शक