मुंबई: रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड प्रकरणात सीबीआयने विशेष सीबीआय न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले. रिलायन्स एडीए समूहातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात कंपन्या, एका सनदी लेखापालासह ११ आरोपींचा समावेश आहे.
या प्रकरणातील तपासात रिलायन्स होम फायनान्सने कर्जाच्या माध्यमातून उभारलेला तब्बल ७ हजार ४२९.१६ कोटी रुपयांचा निधी मध्यस्थ आणि ‘कंड्युट संस्था’ म्हणजे मध्यस्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून रिलायन्स एडीए समूहातील विविध कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
कर्जदार बँका आणि वित्तीय संस्थांनी घातलेल्या अटींचे उल्लंघन करून हा निधी वळविल्याने संबंधित बँका व वित्तीय संस्थांना आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात रिलायन्स होम फायनान्सचे संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित बापना, रिलायन्स कॅपिटलचे समूह व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अमिताभ झुनझुनवाला आणि रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी सुरेश नागराजन यांचा समावेश आहे.
याशिवाय, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रिलायन्स पॉवर लिमिटेड, रिलायन्स बिग एंटरटेनमेंट प्रा. लि., रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड, रिलायन्स बिझनेस ब्रॉडकास्ट न्यूज होल्डिंग्ज लिमिटेड, रिलायन्स मीडियावर्क्स फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. आणि कुंजबिहारी डेव्हलपर्स प्रा. लि. या सात कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे सनदी लेखापाल आणि वैधानिक लेखापरीक्षक विजय नपावालिया यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
रिलायन्स एडीए समूहातील प्रकरणांत सात आरोपपत्रे
सीबीआयच्या बँकिंग सिक्युरिटीज फ्रॉड ब्रांच, दिल्लीने विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एलआयसी आणि ईपीएफओच्या तक्रारींच्या आधारे रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स कॅपिटलविरुद्ध एकूण नऊ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
या समूहाशी संबंधित प्रकरणांत सीबीआयने यापूर्वी सहा आरोपपत्रे दाखल केली होती. आरएचएफएल प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र मिळून रिलायन्स एडीए समूहाशी संबंधित प्रकरणांतील हे सातवे आरोपपत्र ठरले आहे. या सर्व प्रकरणांत सीबीआयने आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.