Bank Fraud Case
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी एका मोठ्या बँक फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला. तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM) आणि त्यांचे प्रमोटर डायरेक्टर अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबईतील ठिकाणांवर छापेमारी केली, असे वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
या प्रकरणात एका कथित फसवणुकीचा समावेश असून ज्यामुळे स्टेट बँकेला ऑफ इंडियाला २ हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. १७ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या अनेक बँक कर्ज घोटाळ्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ५ ऑगस्ट रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांची सुमारे १० तास चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आता छापे टाकण्यात आले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागण्यात आली होती. येस बँकेने मंजूर केलेल्या कर्जांमध्ये अनियमितता आणि इतर कंपन्यांद्वारे निधी वळवला असल्याचा ईडीला संशय आहे. बँक अधिकारी आणि कर्जदार कंपन्यांमध्ये लाचखोरी अथवा आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एसबीआयकडून रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्याला जून महिन्यात फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. आता सीबीआयच्या कारवाईमुळे अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.