मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स एडीए समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये शनिवारी मुंबई आणि दिल्लीतील १५ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.
रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) या कंपन्यांविरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासाचा हा भाग असून, या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयच्या माहितीनुसार, रिलायन्स एडीए समूहाशी संबंधित २३ परस्पर-संबंधित कंपन्या व संस्थांची झडती घेण्यात आली. या संस्थांचा वापर आरसीएफएलआणि आरएचएफएल यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम इतर रिलायन्स एडीए समूहातील कंपन्यांकडे वळविण्यासाठी 'कंड्युट' म्हणून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना मोठा आर्थिक फटका बसल्याचा सीबीआयचा दावा आहे.
या कारवाईत आरसीएफएलचे माजी मुख्य वित्त अधिकारी , रिलायन्स एडीए समूहाचे माजी सचिवालय प्रमुख आणि आरएचएफएलचे माजी मुख्य ट्रेझरी सल्लागार यांच्या ठिकाणांचीदेखील झडती घेण्यात आली. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
सीबीआयने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम), आरसीएफएल, आरएचएफएल आणि रिलायन्स टेलिकॉम यांच्याविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या तक्रारींवरून एकूण सात एफआयआर दाखल केले आहेत.
या सात प्रकरणांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीचे सुमारे २७ हजार ३३७ कोटींचे कथित नुकसान झाल्याचा आरोप आहे. यापूर्वी सीबीआयने ३८ ठिकाणी छापे, चार आरोपपत्रे दाखल केली असून सात आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.