मुंबई : बँकांची २१०.१३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चंद्रा प्रोटेको लिमिटेड कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे संचालक रणजीत गुप्ता, अनिलेश गुप्ता आणि अपर्णा गुप्ता यांच्यासह अज्ञात सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार आरोपांची नोंद करण्यात आली आहे.
इंडियन बँकेच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने २९ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल केला. त्यानंतर कंपनीच्या संचालकांशी संबंधित उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत संबंधित कालावधीतील लेजर आणि अन्य संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या व्यवहारांमुळे तक्रारदार इंडियन बँकेसह एकूण पाच बँकांचे सुमारे २१०.१३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सीबीआयने प्रयागराज येथे केलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या लेखा नोंदी आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. कर्जाची रक्कम नेमकी कुठे वापरण्यात आली, संबंधित कंपन्यांमध्ये किती निधी वळविण्यात आला आणि या व्यवहारांत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध घेतला जात आहे.
कर्जातून मिळालेल्या निधीचा गैरवापर
चंद्रा प्रोटेको लिमिटेडने इंडियन बँकेच्या नेतृत्वाखालील सहा बँकांच्या समूहाकडून एकूण ५४१.४६ कोटी रुपयांची कर्जसुविधा घेतली होती. यामध्ये रोख पतमर्यादा (कॅश क्रेडिट), मुदत कर्ज आणि पतपत्रांचा समावेश होता.
कंपनीने कर्जातून मिळालेल्या निधीचा मंजूर उद्देशासाठी वापर न करता आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. बँकांच्या समूहाबाहेरील अन्य बँकांमध्ये गुप्त खाती चालविणे, समान संचालक असलेल्या कंपन्या आणि संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून पतपत्रांशी संबंधित व्यवहार करणे, अशा पद्धतींचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
अधिकाऱ्यांची होणार चौकशी
या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकारी आणि खासगी व्यक्तींची भूमिका तपासली जाणार आहे. कर्ज मंजुरी, निधीचा वापर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये कोणाची मदत झाली का, याचीही चौकशी होणार आहे.