मुंबई : देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा नामांकित व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट)2025 च्या निकालात आठ राज्यातील 12 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले 99.99 पर्सेंटाइल 26 जणांना तर 99.98 पर्सेंटाइल 26 असे 52 उमेदवार असून, त्यामध्ये बिगर-अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे.
राष्ट्रीय पातळीवरील कॅट परीक्षेसाठी यंदा देशभरातून 2.95 लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 1.10 लाख महिला, 1.85 लाख पुरुष आणि 9 तृतीयपंथी उमेदवार होते. प्रत्यक्ष परीक्षेला 2.58 लाख उमेदवार बसले. यामध्ये 97 हजार महिला, 1.61 लाख पुरुष तर 9 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता. परीक्षेसाठी समन्वयक संस्था म्हणून आयआयएम कोझिकोडे यांच्याकडे होती. यंदाच्या निकालात 100 पर्सेंटाइल मिळविणारे देशभरातून एकूण 12 उमेदवार आहेत.
या परीक्षेच्या गुणांच्या आधारे आणि संबंधित प्रवेश धोरणांनुसार सर्व आयआयएम संस्थांकडून लवकरच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहेत. याशिवाय, यंदा 93 बिगर-आयआयएम संस्था त्यांच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी कॅट 2025च्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे.
गुणवंतांच्या यादीत महाराष्ट्रातील एक उमेदवार असून, या 12 जणांमध्ये 10 पुरुष व 2 महिला उमेदवार असून, त्यात 3 अभियांत्रिकी आणि 9 बिगर-अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत. तसेच 99.99 पर्सेंटाइल मिळविणाऱ्या 26 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील चार उमेदवार, तर 99.98 पर्सेंटाइल गाठणाऱ्या 26 जणांमध्ये महाराष्ट्रातील दोन उमेदवार आहेत. उच्च पर्सेंटाइल मध्ये बिगर-अभियांत्रिकी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे या आकडेवारीत दिसून येते.