Cancer Screening Maharashtra Pudhari
मुंबई

Cancer Screening Maharashtra: राज्यात वर्षभरात तीन कोटी कर्करोग तपासण्या; 1,677 रुग्णांमध्ये कॅन्सरचे निश्चित निदान

मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगावर भर; ग्रामीण भागात मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी व जनजागृती मोहीम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात गेल्या वर्षभरात तीन कोटी कर्करोग स्क्रीनिंग तपासण्या करण्यात आल्या असून, त्यातून 41,169 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5,944 रुग्णांच्या बायोप्सी करण्यात आल्या असून 1,677 रुग्णांमध्ये कर्करोगाचे निश्चित निदान झाले आहे. यातील 416 रुग्णांवर सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू करण्यात आली. या मोहिमेत 30 वर्षांवरील नागरिकांचा समावेश करण्यात आला असून, मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला आहे.

या तपासणी मोहिमेत कर्करोगासोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह आणि ॲनिमिया यांसारख्या आजारांचीही मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात येत आहे. उच्च रक्तदाबासाठी 1.49 कोटी तपासण्यांमधून 11.21 लाख रुग्ण, तर मधुमेहासाठी 1.39 कोटी तपासण्यांमधून 5.60 लाख रुग्ण आढळले. ॲनिमियासाठी 58.74 लाख तपासण्यांमधून 7.07 लाख महिलांमध्ये ॲनिमिया असल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तपासणी व जनजागृती करण्यात येत आहे.

महिलांची तपासणी

गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या मोहिमेत स्तन कर्करोगासाठी 85.99 लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून 471 रुग्णांचे निदान झाले. गर्भाशयमुख कर्करोगासाठी 56.49 लाख महिलांची तपासणी होऊन 243 रुग्ण निदानित झाले.

महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स

महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स हा उपक्रम कर्करोग उपचार सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी विद्यार्थी असलेल्या तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट व विशेषज्ञ डॉक्टरांचे हे स्वयंसेवी नेटवर्क असून, या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर दर दोन महिन्यांनी जिल्हा रुग्णालयांना भेट देतात. गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी, निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT