Ola Uber Rapido Cab Rickshaw Drivers Strike 7 February 2026
मुंबई : देशात सुरू असलेल्या बेकायदा बाईक-टॅक्सी सेवा तसेच ओला, उबर व रॅपिडो या कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी धोरणाविरोधात शनिवारी (दि.7) राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब व रिक्षाचालक एकदिवसीय बंद पुकारला आहे. हा बंद देशव्यापी असल्याचे भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
अनेक महिन्यांपासून रिक्षा व कॅबचालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ओला, उबर व रॅपिडो या कंपन्यांना सरकारमान्य आदेशांचे पालन करण्याबाबत सातत्याने आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. असे असताना कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यास परिवहन विभाग धजावत नसल्याने कॅब, रिक्षाचालकांत नाराजी आहे.
बेकायदा बाईक टॅक्सी सेवांमुळे मुंबईमध्ये काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले असून अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. ही सेवा बेकायदा असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा विमा (इन्शुरन्स) लाभ मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच पॅनिक बटणच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कॅबचालकांची आर्थिक लूट सुरू आहे.
केंद्र सरकार मान्यताप्राप्त पॅनिक बटण सेवा उपकरण पुरवणाऱ्या एकूण 140 कंपन्या अस्तित्वात असताना राज्यसरकारने त्यातील सुमारे 70 टक्के कंपन्यांना अनधिकृत ठरविले आहे. त्यामुळे कॅबचालकांना त्यांनी आधी बसवलेली उपकरणे काढून टाकून सुमारे 12 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे तर विनाकारण नवीन उपकरणे बसवावी लागत आहेत.
सरकारने अवलंबलेल्या खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे गरजेपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर उतरल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न विभागले गेले आहे. ते लक्षणीयरित्या कमी झाले आहे. परिणामी रस्त्यावरील वाहतूक कोंडी व वाहतूक समस्या वाढत आहेत. या सर्व गंभीर बाबी आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व चालकांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा देशव्यापी एकदिवसीय बंद करणार आहे.
ओला, उबर व रॅपिडो या कंपन्यांची मनमानी भाडे आकारणी.
पॅनिक बटणच्या नावाखाली कॅबचालकांची आर्थिक लूट.
खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षाचालकांवर उपासमारी.