

मुंबई ः नरेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केले असून या घडामोडींवर काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व नजर ठेवून आहे. भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटापेक्षा शरद पवार गट भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होईल की आणखी काय, अशा अनेक पर्यायांवर काँग्रेसमध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर शरद पवार यांच्यासह काही नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत 40/50 आमदारांचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे.
अजित पवार यांनी मोठा गट भाजपसोबतच्या सत्तेत आणल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने आठ जागा जिंकल्या; तर काँग्रेसनेही चांगले यश मिळविले. त्यामुळे शरद पवार गट जर काँग्रेसमध्ये विलीन झाला, तर काँग्रेसची ताकद वाढेल, असा एक विचार काँग्रेसमध्ये आहे.
शरद पवार यांनी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व राखले आहे. पण यात काँग्रेसच्या मोठ्या व्होट बँकेचे विभाजन झाले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना, राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम आहे, असे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीवर टीका करत. परंतु 2014 नंतर तर राष्ट्रवादीशिवाय भाजपविरोधात उभे राहता येणार नाही, म्हणून काँग्रेसने राष्ट्रवादीशी जुळवून घेतले.
दिवंगत अजित पवार यांनी त्यांच्या हयातीत राष्ट्रवादी विलीनीकरणाची सुरू केलेली कथित प्रक्रिया हा 2029 च्या विधानसभा निवडणुकीचा एक अजेंडा होता. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सगळी समीकरणेच बिघडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हे भाजप विरोधातील आघाडीसाठी काँग्रेससाठी फायदेशीर असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होणे काँग्रेससाठी तोट्याचे आहे.
त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र आणतात की राष्ट्रवादी विखुरली जाते, यावर काँग्रेसची नजर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वीच्या काँग्रेस विचारधारेशी जोडले गेले आहेत ते भविष्यात काँग्रेसची वाट धरू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे अपेक्षित विलीनीकरण झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असाही मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घडामोडींवर काँग्रेसची नजर आहे.