मुंबई: भायखळा जे. जे. परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या भायखळा उड्डाणपुलाच्या कामाने म्हणावा तेवढा वेग पकडलेला नाही. या पुलाचे काम बांधकामाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्यामुळे मे २०२८ची पूल पूर्ण होण्याची डेडलाईन चुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भायखळा येथील सीताराम सिलम उड्डाणपूल (वाय ब्रिज) ते जे. जे. उड्डाणपूल यांना जोडणाऱ्या जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालय जंक्शन येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
उड्डाणपुलाच्या मुख्य केबल - स्टे व वायाडक्ट भागाची एकूण रचना २ अधिक २ लेन स्वरूपाची आहे. केबल - स्टे भागाची लांबी सुमारे २३० मीटर, तर वायाडक्टची लांबी ३१२ मीटर आहे. या संरचनेच्या बांधकामामध्ये आरसीसी तसेच स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
अलीकडेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या पुलाची पाहणी करून, कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते. परंतु आव्हानात्मक कामामुळे ही डेडलाईन पाच ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी सुटणार
उड्डाणपुलामुळे सर जमशेटजी जीजीभाई मार्गासह भायखळा, नागपाडा, माझगाव या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक पट्ट्यातील जंक्शनवरील कोंडी कमी होणार आहे. त्याशिवाय या मार्गावरील प्रवास जलद होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे.