मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भारतीय नर्सिंग कौन्सीलने प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविल्यामुळे सीईटी सेलनेही प्रवेशाला 5 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नर्सिंग अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी भारतीय नर्सिंग कौन्सीलने बीएस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल केला. पूर्वी प्रवेशासाठी आवश्यक असलेली 50 टक्के पर्सेंटाईल गुणांची अट काढून टाकली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एमएच नर्सिंग सीईटी दिलेली आहे, असे सर्व विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र राहणार आहेत. या शिथिल केलेल्या पात्रतेमुळे या अभ्यासक्रमासाठी इच्छुक अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी नर्सिंगची एमएच सीईटी दिलेली आहे पण 50 टक्के पर्सेंटाईल गुण न मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेशाचा अर्ज केला नाही ते सर्व विद्यार्थी आता प्रवेशासाठी नोंदणी करू शकणार आहेत. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशासाठी नोंदणी करावी. तसेच यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी अपूर्ण आहे, त्या विद्यार्थ्यांनी देखील आपली प्रवेशाची नोंदणी पूर्ण करावी, म्हणजे त्यानाही प्रवेशाची संधी मिळेल.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत, तसेच पात्रता निकषात बदल झाल्याने प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनाही एक संधी देऊ केली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.