Housing society projects : हाऊसिंग सोसायट्यांच्या स्वयं-समूह पुनर्विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण
मुंबई : मुंबईसह राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला आणि समूह पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असेल.
राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन आणि सवलती देण्याबरोबरच सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयातील विविध मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यात येणार्या अडचणी दूर करण्याकरिता महायुती सरकारने 24 एप्रिल 2025 रोजी आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला होता. या अभ्यासगटाने अडीच महिन्यांनंतर 14 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे.
मुंबईसह राज्यभरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास गतिमान करण्यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्वयंपुनर्विकास आणि समूह पुनर्विकास करण्यासाठी हे प्राधिकरण असल्याने कोणत्याही बिल्डरकडे न जाता अशा पुनर्विकासासाठी रहिवाशांना अर्थसहाय्य मिळणे या प्राधिकरणामुळे सुलभ होईल आणि बिल्डर देतो त्यापेक्षा मोठे घर,तेही कमी पैशांत रहिवाशांना मिळेल. याचा उत्तम दाखला प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने मुंबईत सुरू झालेल्या स्वयंपुनर्विकास योजनेत पुढे आला आहे.
राज्य सरकारने या योजनेला राजाश्रय दिल्यामुळे ही योजना मुंबईत गतिमान झाली. मुंबई जिल्हा बँकेकडे स्वयंपुनर्विकास योजनेसाठी आजपर्यंत 1600 प्रस्ताव आले असून, त्यापैकी 40-45 संस्थांना कर्ज देण्यात आले आणि 18 इमारती मुंबईत स्वयंपुनर्विकासातून उभ्यादेखील राहिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करून त्याचे अध्यक्षपद या योजनेचे प्रवर्तक प्रवीण दरेकरांकडेच दिल्याने आता स्वयंपुनर्विकास योजनेची चळवळ राज्यव्यापी होऊ घातली आहे.
प्रवीण दरेकर यांना प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेमताना त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचाही दर्जा देण्यात आला आहे.
मंत्रिपदाच्या दर्जानुसार प्रवीण दरेकर यांना सर्व भत्ते व सुविधा मिळणार असून त्याची जबाबदारी म्हाडा प्राधिकरणाकडे सोपविण्यात आली आहे.
स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाची नोडल एजन्सी म्हणून म्हाडा काम पाहणार आहे.
प्राधिकरणाच्या कामकाजासाठी आवश्यक कार्यालयीन जागा व कर्मचारी वर्गाची नेमणूक, त्यांच्या भत्त्याची तरतूद देखील म्हाडा करणार आहे.
मुंबईसह राज्यभरातील स्वयंपुनर्विकासाचे सर्व निर्णय यापुढे हे स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण घेईल.

