BMC BJP MAYOR Ritu Tawde Pudhari
मुंबई

BMC Mayor: 44 वर्षांनी मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर; '50 खोके, एकदम ओके', CM समोरच विरोधकांच्या घोषणा

Mumbai Bjp Mayor Ritu Tawde: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 44 वर्षांनी भाजपचा महापौर विराजमान झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Bjp Mayor Ritu Tawde Shiv Sena Deputy Mayor Sanjay Ghadi

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत तब्बल 44 वर्षांनी भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. दुपारी १२ वाजता महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिकेत उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे मनसेने महापौरपदाच्या निवडीबाबत तटस्थ भूमिका घेतली. महापौरपदाच्या या सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी '50 खोके, एकदम ओके', अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडला.

मुंबई महापौर व उपमहापौर निवडणुकीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने माघार घेतल्यामुळे बुधवारी महापौर व उपमहापौरांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले होते. यानुसार बुधवारी दुपारी पीठासीन अधिकारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दोन्ही नावांची महापालिका सभागृहात घोषणा केली.

किशोर पेडणेकरांचा आक्षेप

गणेश खणकर यांनी महापौर आणि उपमहापौरपदासाठीचा प्रस्ताव मांडला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी हरकत घेतली. 'आयुक्त प्रशासक म्हणून बसले आहेत. सभागृहाचे वरिष्ठ सभागृह हे काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज करु शकले असते. श्रद्धा जाधव या सात वेळा निवडून आल्या आहे, त्यांना ही संधी देण्यात आली नाही, याचा आम्ही निषेध करतो', असे किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

किशोरी पेडणेकरांना आयुक्तांचं उत्तर

'आयुक्त हे हे पीठासीन अधिकारी म्हणून संचालन करत आहे. किशोरी पेडणेकर यांच्या बोलण्यात तथ्य नाही. 22 जानेवारी 2026 ची सूचना वाचवून दाखवत आहे. पिठासीन अधिकारी हे शासनाने निर्णय दिले असून त्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. म्हणूनच मी सदर सभेचे संचलन करत असून पीठासीन अधिकाऱ्याच्या मुद्द्यावर केलेल्या हरकती मध्ये तथ्य नाही असे मी सांगतो', असं भूषण गगराणींनी सांगितले.

'५० खोके' घोषणा

यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या. तर भाजप- शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत प्रत्युत्तर दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT