मुंबई : राज्यातील बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत चारही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार चौथ्या फेरीनंतर नंतर तब्बल 14 हजार 455 जागा रिक्त आहेत.
फार्मसीचे प्रवेश चालू झाल्यानंतर पहिल्या फेरीत 16 हजार 604, दुसऱ्या फेरीत 8 हजार 80, तिसऱ्या फेरीत 3 हजार 578 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर चौथ्या फेरीत 3 हजार 633 विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या होत्या.
प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असलेली फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ची मान्यतेची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, हा मुद्दा यंदाही प्रकर्षाने समोर आला. मान्यतेतील विलंबामुळे प्रवेश वेळापत्रक 30 सप्टेंबरनंतर पुढे ढकलावे लागले. सीईटी निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांहून अधिक प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागल्याने अनेकांनी इतर अभ्यासक्रम किंवा इतर राज्यातील पर्यायी पर्याय निवडले, अशी माहिती सीईटी कक्षाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, आता चौथ्या फेरीसह संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे. 11 नोव्हेंबरपासून संस्थांना रिक्त जागांची यादी आपल्या संकेतस्थळावर व वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून, मेरिट लिस्ट तयार करून प्रवेश पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर असेल. त्यामुळे उर्वरित जागा किती भरल्या जातात, याकडे विद्यार्थ्यांसह संस्थांचेही लक्ष लागले आहे.