मुंबई : दंडाच्या रक्कमेवरून टीसी अधिकार्याशी वाद घालून टीसी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राहुल सुनील रसाळ या 23 वर्षांच्या तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सेकंड क्लासच्या तिकिटावर फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास करताना मिळून आल्यानंतर हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपरेकर यांनी सांगितले. विरारचे रहिवासी असलेले समशेर इब्राहिम हे पश्चिम रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजता ते अंधेरी-बोरिवली लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशांचे तिकीट चेक करत होते.
याच डब्यात राहुल हा त्याच्या पुरुष आणि महिला असलेल्या दोन सहकार्यांसोबत प्रवास करत होता. त्यांच्याकडे सेकंड क्लासचे तिकीट होते, त्यामुळे त्यांच्यावर समशेर यांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र दंडाच्या रकमेवर त्यांच्यात वाद झाले होते. तोपर्यंत ही लोकल बोरिवली रेल्वे स्थानकात आली होती. त्यामुळे या तिघांनाही बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहाच्या टीसी कार्यालयात आणण्यात आले होते. तिथेच समशेर आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याने त्यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
टीसी कार्यालयातील सुमारे दीड लाख रुपयांच्या शासकीय मालमत्तेची तोडफोड करून राहुलने नुकसान केले. कार्यालयातील संगणक त्याने फोडून टाकले. त्यामुळे तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी खुपरेकर व त्यांच्या पथकाने धाव घेतली होती. या पथकाने राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. समशेर इब्राहिमच्या जबानीवरून घडलेला प्रकार उघडकीस येताच त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच राहुलला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.