Mumbai Bribe Case pudhari photo
मुंबई

Mumbai Bribe Case : बोरिवली ठाण्यातील उपनिरीक्षक १.३० लाखांची लाच घेताना अटकेत

तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारताना बोरिवली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई घटकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. ज्ञानेश्वर पराडे (३१) असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार तसेच त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी पराडे यांनी तक्रारदाराकडे १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यावेळी लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्याचे पराडे यांनी मान्य केले. त्यानुसार सोमवारी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पराडे यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, त्यांच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू होती.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. पराडे यांना आज संध्याकाळी बोरिवली पोलिस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT