मुंबई: पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यास विरोध केला म्हणून रागाच्या भरात पेट्रोल पंपाच्या कर्मचार्याला कारने फरफरत नेल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली. या घटनेत प्रमोद बाबूराव सुकाळे या कर्मचार्याला दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्याच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी कारचालक ब्रिजलेश शामभवन दुबे याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याच गुन्ह्यांत रविवारी त्याला अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही घटना रविवारी रात्री साडेबारा वाजता बोरिवलीतील मागाठाणे एचपी पेट्रोलपंपमध्ये घडली. प्रमोद बाबूराव सुकाळे हा मिरारोड येथे राहात असून सध्या मागाठाणे एचपी पेट्रोलपंपावर कॅशिअर म्हणून काम करतो.
तिथेच हेमंत सावंत हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने संदीप दुबे या कर्मचार्याला कामावरुन काढून टाकले होते. त्याचा संदीपच्या मनात राग होता. त्याने ही माहिती त्याचा भाऊ ब्रिजलेश दुबेला सांगितली होती. त्यामुळे रविवारी रात्री साडेअकरा वाजता ब्रिजलेश हा तिथे आला होता.
कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून त्याने हेमंतशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी ब्रिजलेशच्या हातात सिगारेट होते, त्यामुळे प्रमोद सुकाळे याने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करुन त्याला पेट्रोलपंपावर सिगारेट पिऊ नकोस. नाहीतर मोठा अनर्थ होईल असे सांगितले.
त्याचा राग आल्याने त्याने त्याच्या अंगावरुन कार चढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रमोदने कारचे बोनेट पकडले होते. याच परिस्थितीत ब्रिजलेशने कार वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने सुसाट पळविली होती. या प्रकारामुळे प्रमोदच्या जिवावर बेतू शकते ही माहिती असताना त्याने कार न थांबविता त्याला काही अंतर नेले. त्यानंतर त्याने दोन ते तीन वाहनांना जोरात धडक दिली होती.