

मुंबई: राज्यात मान्सून मंदावल्याने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पाऊस लांबल्याने केवळ एक टक्का धूळपेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने बैठकीत दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन करा, असे निर्देश सर्व मंत्र्यांना दिले. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, सर्वांना पाणी पुरेल याची दक्षता घ्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
देशात अल निनाे सक्रिय झाला आहे. उत्तरेकडील उष्ण वाऱ्याचा जोर वाढल्याने मान्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पश्चिमेकडील वाऱ्याच्या व्यत्ययामुळे आर्द्रतेचा प्रवाह खंडित झाला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची हालचाल थांबली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिगंल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. २३ ते २८ जूनदरम्यान मुंबई आणि किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला असला तरी तूर्त पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पेरणीसाठी अनुकूल काळ नसल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी जपून वापरण्याची गरज, तसेच नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. टंचाई कालावधीमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असेल तरच शेतीला पाणी द्यावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीत दिली.
राज्यातील मोठ्या धरणांत सध्या ३१ टक्के पाणीसाठा आहे. यात कोयना ९ टक्के, जायकवाडी २९, उजनी शून्य टक्के, भातसा ३२ टक्के, गोसेखुर्द ३४ टक्के, खडकवासला १७ टक्के, अप्पर वर्धा ४४ टक्के, अप्पर वैतरणा ३६, भंडारदरा १९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
पेरण्या खोळंबल्या
मोसमी पावसाची वाटचाल रखडल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्याची माहिती कृषी विभागाने दिली. राज्याच्या काही भागांत भात, सोयाबीन, भूईमुगाच्या होणाऱ्या धूळपेरण्याही थांबल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार केवळ १ टक्के धूळपेरणी झाली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.