बोरिवलीत बनावट प्रस्ताव सादर करुन झोपडपट्टी पुनर्वसन राबविण्याचा प्रकार (Pudhari File Photo)
मुंबई

Borivali Fake Proposal Slum Redevelopment | बोरिवलीत बनावट प्रस्ताव सादर करुन झोपडपट्टी पुनर्वसन राबविण्याचा प्रकार

Biometric Survey Cancellation Demand | झोपडीधारकांकडून बायामेट्रिक सर्वेक्षण रद्दची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बोरिवली (पश्चिम) एकसर व्हिलेज प्लॉट नं. 401 व 402 येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना संमतीसाठी प्रभाकर वैती यांनी इमला मालक असल्याचे भासवून ‘मारुती रहिवासी सेवा संघ एसआरए सीएचएस (प्रस्तावित)’ या नावाने बनावट पुनर्विकास प्रस्ताव सादर केला आहे. रहिवाशांची या प्रस्तावाला सहमती नाही. अशा नावाची संस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही. तरीसुध्दा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रशासनाने सदर झोपडपट्टीचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याने झोपडीधारकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून एसआरए प्राधिकरणाकडून 11 ऑगस्ट 2025 रोजी होणारे बायोमेट्रिक सर्वेक्षण रद्द करण्याचे निर्देश एसआरएने देण्याची मागणी झोपडीधारकांनी केली.

बोरिवलीत श्री स्वयंभू जय हनुमान सोसायटी या नावाने झोपडपट्टी वसलेली आहे. ही मिळकत दाजी सामंत यांच्या नावे होती, सन 2015 मध्ये ती महाराष्ट्र शासनाच्या नावे होऊन मालमत्ता पत्रकात तशी नोंद करण्यात आली. तथापि, वजिरा कोळीवाडा गावठाण, बोरिवली या ठिकाणी राहणारे प्रभाकर वैती यांनी या मिळकतीवर ते इमला मालक असल्याचे भासवून झोपड्या विकत होते. कोणत्याही कागदपत्रावर वैती याच्या नावाची तशी नोंद नाही. तरीसुध्दा सन 2023 मध्ये अनेक रहिवाशांकडून वीज व पाणी मीटर घ्यायच्या निमित्ताने त्यांंच्या नावांची यादी तयार केली, त्यावर त्यांचे फोटो लावून सह्या व अंगठ्यांचे ठसे घेतले. आणि पुढे हीच यादी जोडून पुनर्विकासासाठी संमती असल्याचे भासविले आणि मारुती रहिवासी सेवा संघ एसआरए सीएचएस (प्रस्तावित) या बनावट नावाने पुनर्विकास प्रस्ताव सादर केला. अशा नावाची संस्था या ठिकाणी अस्तित्वात नसल्याची तक्रार श्री स्वयंभू जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष विरभद्रया मटपती आणि सचिव बाळू खुरंगे यांनी एसआरए प्राधिकरणाकडे केली.

तसेच वैती यांनी दिनांक 05/02/2023 रोजी श्री स्वयंभू मारुती मंदिराच्या आवारात सर्वसाधारण सभा झाल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती झोपु प्राधिकरणाला सादर केली आहेत. सदरची सभा प्रत्यक्षात झालेली नाही, विकासक नेमण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे अपेक्षित असताना व तसे करणे आवश्यक असतानासुध्दा सर्वच विषय एकाच सर्वसाधारण सभेत मंजूर करवून घेण्याचा प्रयत्न केला.

पूर्वीपासूनच श्री स्वयंभू जय हनुमान सोसायटी अस्तित्वात आहे. विरभद्रया मटपती त्याचे अध्यक्ष आहेत, तर बाळू खुरंगे हे सचिव आहेत. तसेच स्मिता खरात या खजिनदार आहेत. संस्थेच्या सभा घेण्याचे अधिकार या पदाधिकार्‍यांचे असताना त्यांना डावलून बनावट संस्थेच्या नावाने सभा घेऊन बनावट प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामुळे सभा घेतल्याचा दावा खोटा असून त्याबाबतीतले इतिवृत्त, हजेरी पट इत्यादी सर्व कागदपत्रे खोटी व बनावट आहेत. प्राधिकरणाकडे सादर केलेल्या प्रस्तावात अनेक नावे ही खोटी आहेत, प्रत्यक्षात ते रहिवासी नाहीत. स्वतःला प्रवर्तक म्हणवून घेणारे भारत प्रभाकर वैती हे प्रभाकर वैती यांचे चिरंजीव आहे, वनिता आशिष केणी या प्रभाकर वैती यांच्या कन्या आहेत. ते संस्थेमधील रहिवासी नाहीत, अशी लेखी तक्रार श्री स्वयंभू जय हनुमान सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी एसआरए प्राधिकरणाला केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT