Konkan Railway  Pudhari
मुंबई

Konkan Railway Reservation : कोकणवासीयांनो.. गणपतीसाठी १३ जुलैपासून करा रेल्वेचे आरक्षण !

नियमित गाड्यांचे ६० दिवस आधी सुरू होणार आरक्षण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

गणेश चतुर्थीला नियमित धावणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करायचा असेल तर, कोकणवासीयांनो.. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्यासह अन्य नियमित गाड्यांचे १३ जुलैपासून आरक्षण करा, अन्यथा गणेशोत्सवात कोकण विशेष गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण मानला जातो. त्यामुळे यावेळी लाखो कोकणवासीय न चुकता आपल्या कुटुंबासोबत गावी जातात. त्यामुळे दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आगाऊ आरक्षण मिळतच नाही. त्यामुळे कोकणवासीयांना मध्य व कोकण रेल्वे तर्फे सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांतून प्रवास करावा लागतो.

या गाड्या वेळेत सुटत असल्या तरी त्या वेळेत पोहचतील याची शाश्वती नाही. त्यामुळे दरवर्षी नियमित गाड्यांचे आरक्षण मिळावे यासाठी कोकणवासीयांची धडपड असते. यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने श्रावणी अमावस्या संपल्यानंतर चाकरमानी गावी जायला निघणार आहेत. श्रावणी अमावस्या शुक्रवार ११ सप्टेंबरला सकाळी ८.५६ वा. संपत असल्याने अनेकजण शुक्रवारी रात्रीपासून आपल्या गावी जाण्यास निघणार आहेत. त्यामुळे ११ सप्टेंबरच्या रात्रीचे कोकणकन्या एक्सप्रेसचे आरक्षण करायचे असेल तर १३ जुलैला आरक्षण सुरू होणार आहे. १२ व १३ सप्टेंबरचे आरक्षण १४ व १५ जुलैला होणार आहे.

गौरीच्या ओवशाला जाणाऱ्या कोकणवासीयांची संख्याही मोठी असते. यंदा गौरी आगमन १७ सप्टेंबरला असून गौरीपूजन १८ सप्टेंबरला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर हा सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी पोचता यावे यासाठी १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठी झुंबड उडणार आहे. हे आरक्षण १९ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांमधून प्रवास करायचा असेल तर आतापासूनच आरक्षणाची तारीख आठवणीत ठेवण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT