मुंबई: दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ८०(१) अंतर्गत दोन महिन्यांची अनिवार्य लेखी नोटीस बजावल्याशिवाय राज्य सरकारविरोधात दिवाणी दावा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
सरकारने आपल्या लेखी निवेदनात याबाबत हरकत घेतली नाही, याचा अर्थ त्यांनी नोटीसची अट माफ केली, असे मानता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हर्ष ॲडव्हर्टायझिंगने राज्य सरकारविरोधात दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळून लावले.
२०१५-१६ मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या दुभाजकाच्या सुशोभीकरण आणि देखभालीचे कंत्राट हर्ष ॲडव्हर्टायझिंगला देण्यात आले होते. यासाठी कंपनीने अनामत रक्कम आणि भाडेही जमा केले होते.
मात्र, नंतर कंत्राटातील अटींमध्ये बदल करण्यात आले आणि १३ जून २०१६ रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता हे कंत्राट अचानक रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात कंपनीने कंत्राट रद्द करण्याची नोटीस बेकायदेशीर ठरवण्यासाठी आणि सुमारे १ कोटी २८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता.
माझगाव येथील नगर दिवाणी न्यायालयाने हा दावा कलम ८० अंतर्गत पूर्वसूचना दिली नसल्याच्या कारणावरून फेटाळला होता. या निर्णयाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, खंडपीठाने कंपनीचा दावा धुडकावला.