मुंबई : दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा जसा जवळच्या शहरांवर परिणाम होतो तसा परिणाम मुंबईच्या प्रदूषणात शेजारील शहरांवर होतो का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करताना या संदर्भात तज्ज्ञांकडून सूचनाही मागवल्या आहेत.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
या वेळी वनशक्ती या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड.जनक द्वाराकादास यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या कंटेनर डेपोमधून सतत होणाऱ्या ट्रक वाहतुकीमुळे गंभीर वायू प्रदूषण होत आहे. अटल सेतू ओलांडल्यानंतर त्या परिसरात 20 व 40 फूट कंटेनर ठेवण्यासाठी चार ते पाच मोठे डेपो आहेत.
या डेपोमधून बंदराकडे किंवा बंदरातून कंटेनर आणणाऱ्या ट्रकची 24 तास वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरात कायम धुळीचे ढग तयार होतात त्यामुळे रस्तेही दिसेनासे होतात,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
याची दखल घेत खंडपीठाने मुंबईतील सर्व प्रदूषण केवळ शहरातच निर्माण होत नाही, तर ते शेजारील शहरांमधूनही येत असावे. जसे दिल्लीच्या बाबतीत हरियाणा आणि पंजाबमधून येणाऱ्या प्रदूषणाची चर्चा होते, तशीच स्थिती मुंबईबाबत असण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच यापूर्वी नियुक्त केलेल्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि निवृत्त न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या समितीसमोर तज्ज्ञांनी प्रदूषणाबाबतच्या सादर कराव्यात असे निर्देश देत याचिकेची सुनावणी एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.
नवी मुंबईत बांधकामामुळे प्रदूषण
नवी मुंबईत विमानतळाचे काम व मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढत असून तिथे योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचा मुद्दा सुनावणीच्यावेळी पुढे आला. खंडपीठाने संबंधित पक्षकारांना या समितीच्या प्राथमिक अहवालाचा अभ्यास करण्याचे आणि समितीला सहकार्य करण्याचे आदेश दिले.