मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील सांताक्रुझ येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका विमानात बाॅम्ब ठेवण्यात आला आहे. हे विमान दहा तासांनी उड्डाण करणार असल्याचा काॅल गुरुवारी डायल ११२ नंबरवर आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासात हा काॅल साताऱ्यातील एका अपंग मुलाने खेळता-खेळता केल्याचे समोर आल्यानंतर सर्वच यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या घटनेची सहार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबई येथे डायल ११२ हेल्पलाईन क्रमांक सुरु आहे. या क्रमांकावर गुरुवारी एका मोबाईल नंबरवरुन काॅल आला. काॅल करणाऱ्याने सांताक्रुझ येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका विमानात बाॅम्ब ठेवण्यात आला आहे. हे विमान दहा तासांनी उड्डाण करणार आहे. पोलीस मदत हवी आहे. असे सांगून काॅल ठेवला. या काॅलने एकच खळबळ उडाली. नवी मुंबई येथून याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. काॅलची दखल घेत संबंधित यंत्रणांना अर्लट जारी करण्यात आला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
सहार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजेन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलिसांनी काॅल आलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे केलेल्या चौकशीत हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले. साताऱ्यातील देऊळ गावात रहाणाऱ्या किराणा दुकानदार विकास देसाई यांचा मोबाईल क्रमांक काॅलसाठी वापरण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता तो कॉल त्यांच्या १० वर्षीय दिव्यांग मुलाने चुकून केल्याचे त्यांनी सांगितले. मुलाला टिव्हीवर गुन्हे मालिका पाहण्याची आवड असून यातून त्याला ११२ हा क्रमांक मिळाला आणि त्याने कॉल केल्याचे समोर आले आहे.