मुंबई : बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याच्या नावाने ऑडिशनसाठी बोलावून महिलांसह तरुणींना अर्धनग्न फोटो पाठविण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चित्रपट निर्मात्याच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांचे सोशल मिडीयावर काही अकाऊंट आहे. एक वर्षांपासून त्यांच्या या अकाऊंटचा अज्ञात व्यक्तीने गैरवापर करण्यास सुरुवात केली होती. नेटफिक्ल्सवर एक वेबसिरीज करत असल्याचे सांगून त्याने काही महिलांसह तरुणींना ऑडीशनसाठी बोलाविले होते. त्यांना बिकनीसह अर्धनग्न फोटो पाठविण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यांत तक्रारदारांना त्यांच्या एका मित्राने याविषयी सांगितले.
दरम्यान एका तरुणीने त्यांना कॉल केला होता. तिने त्यांच्याकडे सीईओ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने ऑडिशनसाठी बोलाविले आहे असे सांगितले. तिला त्याने काही अश्लील फोटो पाठविण्यास सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला काही फोटो पाठविले होते.
अशाच प्रकारे इतर काही महिलांसह तरुणींनी त्यांना संपर्क साधला होता. त्यातील काही महिलांना करार करायचे आहे असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी बोलाविण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.