मुंबई : प्रकाश साबळे
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिकेतील विभाग कार्यालयातील ६ सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून तीन कार्यकारी अभियंत्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी निर्गमित करण्यात आले. त्यामुळे दैनिक पुढारीने ३० जुलै रोजी सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्याची दिलेली बातमी खरी ठरली आहे. दै. पुढारीने नमूद केलेल्या ८ सहाय्यक आयुक्तांच्या वॉर्डातील बदल्यापैकी मालमत्ता विभाग, एम. पूर्व विभाग, के. पूर्व विभाग या ३ सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या.
चेंबूर, साकीनाका दुर्घटना आणि मुंबईची झालेली तुंबई यामुळे महापालिकेच्या कारभाराची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे ठरविले होते. त्यानुसार जुलै महिन्यातील शेवटच्या दिवशी बदल्या करून सहाय्यक आयुक्तांना दणका दिला.
उपायुक्त पदावर पदोन्नती
महानगरपालिका मुख्यालयातील मालमत्ता विभागातील सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहाण यांची हंगामी उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्याकडे 'मध्यवर्ती खरेदी खाते' विभागाचा कार्यभार देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.