मुंबई: तलावातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे मुंबईसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दहा टक्केपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असलेल्या भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी महापालिका सभागृहात दिली.
सध्या सुरू असलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळेच तलावांमध्ये असलेला सध्याचा पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत पुरेल असेही बांगर यांनी स्पष्ट केले. मुंबईतील भीषण पाणीटंचाईवरून सोमवारी महापालिका सभागृहात सुमारे पाच तास चर्चा झाली.
सभागृह नेते गणेश खणकर यांनी निवेदनामार्फत ही चर्चा घडवून आणली. यात ३० ते ३५ पेक्षा जास्त नगरसेवकानी भाग घेतला. या चर्चेत पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे मुंबईकरांचे होणारे हाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. एवढेच नाही तर मुंबई महापालिकेचे पाणीटंचाई टाळण्यासाठी काय नियोजन आहे. याचीही विचारणा करण्यात आली.
सदस्यांच्या मुद्यांवर बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहराला दररोज ४,६०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. परंतु सध्या ४,१०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे अगोदरच पाण्याचा तुटवडा असून त्यात आता कपात केल्यामुळे अजूनच तुटवडा झाला आहे.
त्यामुळे शहरातील उंचावर बांधण्यात आलेले जलाशय पूर्णपणे पाण्याने भरत नाहीत. त्यामुळे अगोदरपेक्षा पाण्याचा दाब कमी झाला आहे. परिणामी उंच भागात, इमारती, चाळी येथे पाणी पोहचत नाही. त्यामुळे ज्या भागात दहा टक्के पेक्षा कमी पाणी मिळते, अशा भागात प्राधान्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेकडे टँकरची कमतरता असल्यामुळे भाड्याने टँकर घेण्यात येत असल्याचेही बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मुंबई शहरात मान्सून दाखल होणार आहे. परंतु जून महिन्याचा कोटा पाऊस पूर्ण करू शकणार नाही. परंतु जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडेल असे अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकटही दूर होईल, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.
बांगर यांनी महापालिकेने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. मुंबई २० टक्के पाणी कपात असून जलतरण तलाव, इमारतीचे बांधकाम, गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध टाकण्यात आले असून त्यांना देण्यात आलेल्या जल जोडण्या कापण्याचे काम सुरू आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे ते म्हणाले.
विहिरीच्या पाण्याचा वापर
पिण्याच्या शुद्ध पाण्याची बचत करण्यासाठी मुंबईतील विहिरींच्या साफसफाईला प्राधान्य देऊन त्यातील पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्यात येणार आहे. त्याशिवाय गळती व चोरी थांबवण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. गारगाई समुद्राचे खारेपाणी गोडे करण्याचा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे नियोजन असल्याचेही बांगर यांनी सांगितले.