मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यामुळे आता थांबवण्यात आलेली अनधिकृत फेरीवाला हटाव मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी कारवाई संदर्भातील आपले नियोजन करावे, असे निर्देश पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे काही अपवाद वगळता शहर व उपनगरातील फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा रेल्वे स्टेशनसह शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले दिसू लागले आहेत. अशा फेरीवाल्यांना पुन्हा हटवण्यासाठी मुंबई महापालिका मोहिम हाती घेणार आहे.
पालिकेच्या विभागनिहाय ही कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे पथक स्थापन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
फेरीवाल्यांसोबत पालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लागेबंध असल्यामुळे अधिकृत फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईची गुप्तता बाळगण्यात येणार आहे. ज्या दिवशी कारवाई करणार त्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन पथकाला याची माहिती दिली जाणार आहे. मात्र नेमकी कारवाई कुठे करणार हे केवळ सहाय्यक आयुक्तांना माहिती राहणार आहे. त्यामुळे पदपथावर बिनधास्तपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांना कारवाईचा थांगपत्ताच लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून त्याचे सामान जप्त करणे शक्य होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अतिक्रमण निर्मूलन पथकामध्ये पोलिसांचाही समावेश करण्यात येणार आहे. तेथे फेरीवाल्यांचा जास्त विरोध राहणार, अशा ठिकाणी अतिरिक्त पोलीस बळाचा वापर करण्यात येणार आहे. एवढेच करतात कारवाईला विरोध करणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.