मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई महापालिकेत 33 पैकी 8 ते 10 साहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असून त्या जागी प्रभारी आणि अतिरिक्त कार्यभार देऊन विभागातील कारभार चालविला जात आहे. यामुळे विभागातील विकासकामांना खीळ बसली आहे. यासाठी आता उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातून मुलाखतीद्वारे पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर साहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे.
गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून आलेल्या 7 ते 8 नव्या साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित वॉर्डांत आजही प्रभारी आणि अतिरिक्त कार्यभार असलेले साहाय्यक आयुक्त कार्यभार सांभाळत आहेत. यापैकी काही प्रभारी साहाय्यक आयुक्त हे कार्यकारी अभियंता संवर्गातील आहेत. ते वॉर्डातील कारभार सांभाळण्यास असमर्थ ठरत आहेत. यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर सहाय्यक आयुक्त नेमणुकीचे आदेश निर्गमित केले आहेत.
सहाय्यक आयुक्त संवर्गातील या पदावर इच्छुक म्हणून उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले, ज्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला असेल, अशांना पूर्णकालीक कार्यभार तत्वावर साहाय्यक आयुक्त म्हणून संधी देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता यांना खातेप्रमुखांच्या अभिप्रायासह 4 नोव्हेंबरपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत.
यांना संधी
या पदासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कमीत-कमी 3 वर्षे सेवा झालेल्या सक्षम व निष्कलंक सेवा असणाऱ्या उपप्रमुख अभियंता किंवा कार्यकारी अभियंत्यांमधून इच्छुक अभियंत्यांना संधी देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदारांनी अर्जासोबत खाते प्रमुखांच्या स्वाक्षरीने चौकशीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच सॅम प्रणालीतील चौकशी प्रमाणपत्र संलग्नित करणे आवश्यक आहे.
या वॉर्डांत प्रभारी साहाय्यक आयुक्त
वॉर्ड - प्रभारी साहाय्यक आयुक्त
ए - जयदिप मोरे
ई - रोहित त्रिवेदी
एल - धनाजी हेर्लेकर
पी.दक्षिण - अजय पाटणे
आर.उत्तर - नयनीश वेंगुर्लेकर
या विभागांत अतिरिक्त कार्यभार (प्रभारी)
अतिक्रमण निर्मूलन, शहर - मृदुला अंडे
अतिक्रमण निर्मूलन, पूर्व उपनगर - विनायक विसपुते
अतिक्रमण निर्मूलन, प. उपनगरे - विनायक विसपुते
करनिर्धारक व संकलक - गजानन बेल्लाळे