मुंबई: मुंबई महानगरपालिकेने ठाणे जिल्ह्यातील तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अपर वैतरणा तलावातील राखीव कोट्यामधून पाणी घेण्यास सुरुवात केली होती.
मात्र ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे पालिकेने अप्पर वैतारणातून पाणी घेणे आता बंद केले आहे.
वैतरणा नदीवर तीन धरणे असून यातील अप्पर वैतरणा धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये असून मध्य वैतरणा व मोडक सागर ही धरण ठाणे जिल्ह्यात आहेत. ही दोन्ही धरण मुंबई महापालिकेच्या मालकीची आहेत. या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावर अप्पर वैतरणातून पाणी घेण्यात येते. अप्पर वैतरणा धरणात तीन पाणी मध्य वैतरणामध्ये आणून पुढे मोडक सागरला नेऊन, ते जलवाहिन्यांद्वारे भांडुप जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते.
जूनमध्ये पडणारा पाऊस लांबल्यामुळे मोडक सागर व मध्य वैतरणात धरणातील पाणीसाठा कमी झाला. तर दुसरीकडे अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठाही शून्य वर पोहचला. परंतु मुंबईतील पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारच्या मंजुरीने अप्पर वैतरणाच्या राखीव कोट्यातून पाणी घेण्यात येत होते. हे पाणी ५ जुलैपर्यंत घेण्यात येत होते. मात्र सहा जुलैपासून हे पाणी घेणे आता बंद करण्यात आले आहे.
पाणीसाठा ७ लाख १५ हजार दशलक्ष लिटरवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ७ लाख १५ हजार २१० दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.
मात्र गेल्या २४ तासात तलाव क्षेत्रात एक थेंबही पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा वाढण्याचा वेग मंदावला आहे. गेल्या २४ तासात १२ हजार दशलक्ष लिटरने पाणीसाठा वाढला आहे.