Mumbai Schools Pudhari
मुंबई

Mumbai Schools: विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची प्रतीक्षा! ९१८ शाळांतील विद्यार्थी २७ वस्तूंपासून वंचित

९१८ शाळांतील विद्यार्थी अजूनही वह्या, दप्तर, गणवेश, चप्पल, छत्री आदी साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल एक महिना उलटला, तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्यापही अत्यावश्यक शालेय साहित्य मिळालेले नाही. 'शाळा प्रवेशोत्सवा'त जूनअखेरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तूंचे वितरण पूर्ण होईल, असा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष आहे. ९१८ शाळांतील विद्यार्थी अजूनही वह्या, दप्तर, गणवेश, चप्पल, छत्री आदी साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई महापालिका दरवर्षी सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांना २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत उपलब्ध करून देते. यामध्ये दोन गणवेश, दप्तर, वह्या, पाण्याची बाटली, डबा, बूट, चप्पल, मोजे, पीटी गणवेश, रेनकोट किंवा छत्री, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिली, रंगकामाचे साहित्य, मुलींसाठी रिबीन, हेअरबँड आणि सॅनिटरी नॅपकिन आदी वस्तूंचा समावेश आहे. मात्र यंदा या वस्तूंच्या खरेदीसाठी प्रथमच 'जेम' पोर्टलचा वापर करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया संथ झाली आहे.

सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, शालेय संचाचे वितरण केवळ चार टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचले असून ९६ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे वह्यांचे वितरण अवघ्या आठ टक्क्यांपर्यंतच झाले असून ९२ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप वह्याच मिळालेल्या नाहीत. गणवेश, छत्री, स्टेशनरी आणि चप्पल यांचे वितरणही अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

रेनकोट, कंपास, पट्टी आणि काही रंगकामाचे साहित्य तुलनेने वितरित झाले असले, तरी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत वस्तूंचाच तुटवडा कायम आहे. परिणामी शिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची तीव्र नाराजी पालकांकडून व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 'जेम' प्रणालीमध्ये प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र पुरवठादार असल्याने खरेदी प्रक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. वह्या, छत्री आणि गणवेशासाठी खरेदी आदेश देण्यात आले असून उर्वरित साहित्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT