BMC Nutrition Bar Pudhari
मुंबई

BMC Nutrition Bar: विरोधानंतरही पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘न्यूट्रिशन बार’ सुरूच; पालिका सभागृहातील चर्चा निष्फळ

विधानसभेतही लक्षवेधीद्वारे उमटले पडसाद ; सर्वपक्षीय नगरसेवकांकडून संतापाचा सूर

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन बार (चॉकलेट)बाबत महापालिका सभागृहासह विधानसभेत पडसाद उमटूनही आजही हा आहार मुलांना सुरुच आहे.

त्यामुळे आमदारांचा विरोध, सर्वपक्षीय नगरसेवकांची बंदीबाबत आग्रही व आक्रमक भूमिका असतानाही हा प्रकार बंद झालेला नसल्याने महापालिका शाळेतील मुलांना अजून किती दिवस हा आहार दिला जाणार आहे, असा संतापाचा सूर नगरसेवकांकडून आळविला जात आहे.

जानेवारीपासून मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात देण्यात येत असलेले न्यूट्रिशन बार वादात सापडले होते. त्यात काचा, प्लास्टिक व दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभेत समोर आल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई महापालिका सभागृहातही उमटले होते.

१८ मार्च २०२६ रोजी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी न्यूट्रिशन बारवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर सभागृहात दोन तास चर्चाही घडली होती. मात्र तरीसुद्धा अजूनही पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन बार दिले जात असल्याने, सभागृहातील सभा निष्फळ ठरली?

नगरसेवकांनी केलेल्या निदर्शनाला आणि मागणीला शिक्षण विभाग प्रशासनाने केराची टोपली दाखविली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. हे न्यूट्रिशन बार विद्यार्थ्यांसाठी पोषक नसून अपायकारक आहे. त्यामुळे त्यावर कायमची बंदी घाला, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

विधानसभा, महापालिकेतही चर्चा

शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत न्यूट्रिशन बार निकृष्ट असल्याचे सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर महापालिका सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी न्यूट्रिशन बारविरोधात आवाज उठविला होता. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी निवेदन करून सदर बार बंद करण्याचे प्रशासनाला निर्देश दिल्याचे सभागृहात सांगितले होते.

आठवड्यातून दोन वेळा होते वाटप

महानगरपालिका शाळेतील बालवाडी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन बार हे जानेवारी २०२६ पासून वाटप केले जात आहे. ते आठवड्यातून दोन वेळा दिले जात आहे. लहान मुले ते खात आहेत. मात्र मोठी मुले फेकून देत असल्याचे महापालिका शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

आश्वासनाची अंमलबजावणी नाहीच

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहारात देण्यात येत असलेले न्यूट्रिशन बारविरोधात शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित कंपनीच्या पुरवठादारांवर गुन्हा दाखल करून गोदाम सील करण्याचे आश्वासन दिले.

कायमची बंदी घालण्याची मागणी

न्यूट्रिशन बार विद्यार्थ्यांसाठी पोषक नसून अपायकारक आहे. त्यामुळे त्यावर कायमची बंदी घाला, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केली आहे. मात्र तरीसुद्धा सदर बार विद्यार्थ्यांना देणे सुरु असेल तर ही सभागृहाची अवहेलना असल्याचे मत सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT