Sanitary Napkin Vending Machines Pudhari
मुंबई

Sanitary Napkin Vending Machines: सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनवर १८ कोटी खर्च; मात्र अनेक ठिकाणी मशीन बंद व गायब असल्याचे उघड

महापालिकेच्या दाव्यानुसार जवळपास २ हजार मशीन मॉनिटर केल्या जात आहेत आणि त्यापैकी १,९९३ मशीन सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता चित्र वेगळच दिसते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनसाठी महापालिकेने तब्बल १८ कोटी ४४ लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु प्रत्यक्षात मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही मशीन बंद, नादुरुस्त किंवा गायब असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या दाव्यानुसार जवळपास २ हजार मशीन मॉनिटर केल्या जात आहेत आणि त्यापैकी १,९९३ मशीन सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता चित्र वेगळच दिसते. मग महापालिकेच्या कागदावर मशीन सुरू आणि प्रत्यक्षात बंद? यामुळे मुंबईकरांचे तब्बल १८ कोटी पाण्यात का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईसारख्या महानगरात महिलांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतोय. राईट टू पी’ सारख्या मोहिमांनंतर महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न झाले.

मात्र, आता याच शौचालयांत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, ग्रँड रोड येथील घनकचरा विभागातून जवळपास २ हजार मशीन मॉनिटर केल्या जात असल्याची माहिती मिळाली.

मासिक पाळीच्या काळात महिलांनी स्वच्छता राखावी, यासाठी शासन आणि महापालिकेकडून जनजागृती केली जाते. पण अचानक गरज पडली तर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर नॅपकिन सहज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असते. मात्र, महापालिकेच्या मॉनिटरिंगच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे पाहणीमध्ये दिसून आले.

मुंबईतील शौचालयासह गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, वरळी सी फेस व शिवाजी पार्क अशा मुंबईतील गर्दीच्या महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा कुठे मशीनचा नॉब खराब, कुठे मशीनची वायर उंदरांनी कुरतडलेली, तर कुठे मशीनच कुचकामी व गायब असल्याचे आढळून आले.

गेटवे ऑफ इंडियावर तर दोन शौचालयांपैकी एका ठिकाणी मशीनच उपलब्ध नाही, तर दुसऱ्या ठिकाणी असलेली जुनी मशीन बंद असल्याचे दिसून आले.

मशीनचा खर्च

एका मशीनची किंमत : ७६,५२८ रूपये

मशीनसाठी निविदा : ६.८७ कोटी

देखभाल- दुरुस्ती : १.५५ कोटी

एकूण खर्च : १८.४४ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT