BMC Officers Transfer Pudhari
मुंबई

BMC Officers Transfer: कित्येक वर्षे एकाच खात्यात अधिकारी कार्यरत; नगरसेवकांच्या प्रश्नाला महानगरपालिका प्रशासनाचे मोघम उत्तर

यावर महापालिका प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन बदलीबाबत निर्णय घेत असल्याचे मोघम उत्तर देऊन, यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांत कित्येक वर्षे अधिकारी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याला नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला असून अशा अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या कराव्यात, अशी मागणी केली आहे. परंतु यावर महापालिका प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन बदलीबाबत निर्णय घेत असल्याचे मोघम उत्तर देऊन, यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

मुंबई महापालिकेतील अनेक खाती अर्थकारणात दडली आहेत. त्यामुळे अशा खात्यांत बदली करण्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची मोठी धडपड सुरू असते. यासाठी मोठे अर्थकारणही होते. अनेक अधिकारी व अभियंते एकाच खात्यात अनेक वर्षे कार्यरत असतात.

त्यामुळे त्या अधिकाऱ्याची त्या खात्यातील मक्तेदारी वाढते. याबाबत काँग्रेसच्या नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यात महापालिकेचे अधिकारी एका खात्यात किती कालावधीसाठी कार्यरत राहू शकतात, याची माहिती मागवली होती. एवढेच नाही तर त्यांनी सांताक्रुझ एच-पूर्व विभागातील उद्यान खात्यामध्ये उमेश परवडे हे दुय्यम अभियंता ते सहाय्यक अभियंता या पदावर तेथेच १२ वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगितले.

हे अभियंते प्रस्ताव बनवण्यापासून कंत्राटदार नेमण्यापर्यंत कंत्राटदारांसमवेत समन्वय साधून कामे पार पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. हे अभियंते एकाच जागेवर कसे काय कार्यरत याबाबत चौकशी करून माहिती देण्यात यावी, अशी मागणीही मिरांडा यांनी केली होती.

याबाबतचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले असून यात महापालिकेच्या धोरणानुसार तसेच प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार त्यावेळी असलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, बदलीबाबत निर्णय घेण्यात येतो, असे मोघम उत्तर दिले. या उत्तरात अभियंता १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत का, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही किंवा चौकशी करणार असल्याचेही सांगण्यात आले नाही.

प्रशासनाला जाब विचारणार

नगरसेवक हरकतीच्या मुद्द्याद्वारे जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोडून प्रशासन मनाला येईल तसे उत्तर देते. त्यामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत येणाऱ्या स्थायी समितीत याबाबत प्रशासनाला धारेवर धरून, जाब विचारला जाणार असल्याचे स्थायी समिती सदस्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT